मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

March, 2008 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंग्रजीचे शिक्षण.

एकदा माजी पंतप्रधान स्व. श्री. राजीव गांधी हे लोकसभेत आणीबाणी का लावता येणार नाही याचे इंग्रजीतून विश्लेषण करीत होते. या दरम्यान स्व. श्री. मधू दंडवते यांना म्हणाले, "दंडवते, आपल्याला इंग्रजी समजत नसेल तर मी काय करू ?"
राजीव गांधी यांच्या अशा खोचक वाक्याला दंडवते यांनीही तशाच झणझणीत शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले, " मी प्राध्यापकाकडून इंग्रजीचे शिक्षण घेतले आहे, हवाई सुंदरीकडून नव्हे."

दुसर्‍या प्रयोगाचे तिकीट.

एकदा जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी चर्चिल यांना आपल्या नव्या नाटकाची दोन तिकीटे पाठविली आणि सोबत एक पत्र लिहीले, " सोबत पाठविलेल्या दोन तिकीटांपैकी एक तुमच्या साठी आहे आणि दुसरे तुमच्या मित्रासाठी, जर एखादा असेल तर !"
चर्चिल यांनी त्या पत्राला उत्तर पाठविले, " या पहिल्या प्रयोगाला मला येता येणार नाही. दुसर्‍या प्रयोगाची दोन तिकीटे पाठवा. जर होणार असेल तर !"

अंतरीक्ष प्रवास.

एकदा कवि सोपानदेव चौधरी रिक्षातून जात असताना, खराब रस्त्यामुळे त्यांचे डोके रिक्षाच्या छताला लागत होते. तेंव्हा ते रिक्षावाल्याला म्हणाले,"अरे, मी रिक्षात बसलेला खरा पण मला अंतरिक्षात पोचवू नकोस !"

शेंडी.

एका कार्यक्रमाला आचार्य अत्रे हजर होते. त्यांच्या अगोदरचे सनातनी गृहस्थ आपल्या भाषणात म्हणाले,"आम्ही शेंडी का ठेवतो, त्याला शास्त्रीय कारण आहे. आमच्या पुर्वजांना माहीत होते की शेंडीत विज असते." त्यांच्यानंतर आचार्य अत्रे बोलायला उभे राहिले व म्हणाले,"शेंडीत विज असते हे कदाचित कुणाला माहीत नसेल. पण मला तसा अनुभव आलाय. मी कॉलेजला गेल्यावर शेंडी काढली आणि माझ्या वडिलांना चांगलाच धक्का बसला !"

सरदारजींची लॉटरी.

एकदा एका सरदारजीला १ कोटिची लॉटरी लागते. सरदारजी पैसे घ्यायला लॉटरी विभागाच्या कार्यालयात जातात.
कार्यालयातील संबंधित अधिकारी सरदारजींना एक फॉर्म देतो व सांगतो आज तुम्ही हा अर्ज भरुन द्या आणि १५ दिवसांनी आपले एक कोटि घेवून जा.
सरदारजींना याचा खुप राग येतो व ते जोरजोरात भांडू लागतात.
अधिकारी त्यांना पैसे मिळायची पद्धत समजावून सांगायचा प्रयत्न करतात.
पण सरदारजींना ते पटत नाही.
सरदारजी रागावून ते बक्षिस लागलेले तिकीट त्या अधिकार्‍याकडे फेकून सांगतात," अशी पद्धत असेल तर हे घ्या तुमचे तिकीट व माझे दहा रुपये परत करा".

आम्ही आळशी नाही.

एका माणसाने रस्त्याने जाताना दोन सरदार बागेत काम करत असलेले बघितले. एक खणत होता तर दुसरा त्यात लगेच माती टाकत होता. त्या माणसाने एका सरदाराला विचारले, "हे तुम्ही काय करताय." सरदार म्हणाला,"आम्ही तिघे इथे काम करतो. माझे काम खड्डा खणणे, दिदारसिंग झाडे लावतो आणि परकाश माती घालतो. आज दिदार आजारी आहे, म्हणुन तो आला नाही, आणि आम्ही आळशी नाही."

नातेवाईक.

एक कैदी दुसर्‍या कैद्याला : तुला भेटायला कोणी येत नाही. तुझे नातेवाईक नाहीत कां ?दुसरा कैदी : खुप आहेत. पण सगळे याच जेल मध्ये आहेत !

पुस्तक.

एक माणूस लायब्ररियनला : मला आत्महत्या कशी करावी या विषयावरच एखादं पुस्तक द्यालं कां ?लायब्ररियन : नाही, तुम्ही मला ते परत करु शकणार नाही.

चिंता.

धनंजयच्या समोर नविन वर्षाचे कॅलेन्डर होते व तो ऑफिस मध्ये डोक्यावर हात ठेवून बसला होता.
"का रे सकाळी सकाळी काय झालं, डोक्यावर हात ठेवून बसायला ?" एक सोबती म्हणाला.
धनंजय," काही नाही रे, या वर्षीच्या सुट्या बघत होतो. या कॅलेंडर वाल्यांनी फार कमी छापल्या आहेत, आणि बर्‍याच रविवारीही ! "

वेड.

एका दारुड्याने मित्राला विचारले, "किती वाजले ?"
मित्र म्हणाला,"बारा"
दारुडा :-"अरे आज मला बहुतेक वेड लागणार आहे."
मित्र :-"का रे काय झाले?"
दारुडा :-" दिवसभरात मी कितीतरी जणांना हाच प्रश्न विचारला पण प्रत्येकाने मला वेगवेगळे उत्तर दिले."

शोध.

महेश फार डोकेबाज होता. त्याने एकदा वर्तमान पत्रात आपल्या अजब शोधाबद्दल जाहीरात दिली," पेन व शाईशिवाय कसे लिहावे. अधिक माहितीसाठी एक रुपया पाठवा.
हजारो लोकांनी महेशला एक एक रुपया पाठवला. महेशने त्या सर्वांना उलट टपाली कार्ड पाठवून सांगीतले,"वेड्यांनो पेंसिलने लिहा, पेन्सिल वापरत जा".

एका दगडात....

रामभाऊ आजारी होते. डॉक्टरांना न बोलावताही डॉक्टर घरी आलेले पाहुन सगळे चकित झाले. वहिनींनी डॉक्टरांना विचारले, " इकडे कसे काय येणे केले". डॉक्टर म्हणाले, " जवळच आणखी एक पेशंट बघायला आलो होतो, म्हटलं, एका दगडात दोन पक्षी मारावेत".

आराम !

बांधकाम मजुर मुकादमाला : "माझं फावडं मिळत नाही, कदाचित चोरीला गेलं असावं".
मुकादम : हरकत नाही, तर तु आज आराम कर.
मजुर तरीही हलेना.
मुकादम : काय झालं ?
मजुर : " फावड्या शिवाय आराम कसा करू ? त्याला टेकूनच तर आम्ही सगळे आराम करतो !"

थंडी.

एक पाकिटमार चालत्या बसमध्ये एका प्रवाशाला म्हणाला, " वैताग आणलाय या थंडीनं"
प्रवाशाने विचारले, "का रे ? काय झालं ?"
पाकिटमार वैतागल्या स्वरात म्हणाला, " सारे लोक खिशातच हात घालून बसतात ना !"

कात्री.

पोटाचे ऑपरेशन झाल्यावर शुध्दिवर येत असलेल्या पेशंटला डॉक्टर म्हणाले," मला कदाचित तुमच्या पोटाचं परत ऑपरेशन करावं लागेल. कारण ऑपरेशन करतांना वापरलेली कात्री आतमध्ये राहिली असावी.
पुन्हा ऑपरेशनच्या कल्पनेने घाबरलेला पेशंट म्हणाला, " डॉक्टर, ती कात्री फार महाग होती कां? मी भरेन त्याचे पैसे."

सुखाचे मरण.

एक जल्लाद आरोपीला फाशी देण्यासाठी जंगलात घेऊन जात होता. रस्त्यात बरेच खाचखळगे, पावसामूळे झालेली निसरडी जागा यामूळे दोघेही चांगलेच वैतागले.
आरोपी म्हणाला," काय रे देवा, सुखाने मरू पण देत नाही !"
जल्लाद म्हणाला," तुला तर तिकडे फक्त जायचे आहे, मला तर याच रस्त्याने परत यायचे आहे !"

भिक्षा.

भिकारी : बाईसाहेब, काही वाढा ना, मी बरेच दिवसांचा उपाशी आहे.
बाई : पुढे जा.
भिकारी : बाई मी मुका आहे.
बाई : जा रे, मी बहिरी आहे.

गेट आऊट.

आमचे एक प्राध्यापक होते. त्यांना एकदा वर्गात खोड्या करण्यार्‍या एका मुलाला बाहेर काढायचे होते, पण Get Out हे शब्द सुचले नाहीत. त्यावर त्यांनी उपाय काढला.
ते स्वत: वर्गाच्या बाहेर गेले, मुलाला म्हणाले "कम हिअर", "स्टँड हिअर" व स्वत: वर्गात येऊन दार लावून घेतलं.